मुंबई : कोरोना काळात अनेक जणांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, रिक्षाचालकही याला अपवाद नाहीत. मात्र, अशा परिस्थितीत एका रिक्षाचालकाने माणुसकीचे दर्शन घडवून आणले आहे. रिक्षामध्ये एका महिला प्रवाशाचे दागिने आणि कपड्याने भरलेली बॅग विसरली होती. त्या रिक्षाचालकाने आपला प्रामाणिकपणा दाखवत महिलेचे दागिने आणि कपडे परत केले. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत पोलीस इन्स्पेक्टर भारत चौधरी यांनी त्यांचा उचित सन्मान आणि सत्कार केला. त्या महिलेने रिक्षाचालकाचे आभार मानले.
पोलीस इन्स्पेक्टर (PI) भारत चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जून रोजी सुनीता शिंदे (रा. रेतीबंदर) ही महिला त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी कुटुंबासह लातूरला निघाल्या होत्या. तेव्हा कळवा नाक्यावर येण्यासाठी रेतीबंदर येथून त्यांनी एक रिक्षा केली होती. रिक्षातून उतरल्यानंतर थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आले की रिक्षामध्ये त्यांची बॅग विसरली आहे. त्या बॅगमध्ये त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी त्यांनी बनवलेले नेकलेस, कानातल्या रिंगा व इतर दागिने होते, तसेच कपडे होते. हे लक्षात येताच, महिला तिच्या कुटुंबियांसह तात्काळ पोलीस स्टेशनला आली. ही महिला अतिशय गरीब घरातील होती, त्यांना काहीही सुचत नव्हते आणि ती महिला रडत होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तक्रार घेतली आणि तपास सुरू केला.
दरम्यान, काल सकाळी (२ जून) रेतीबंदर येथील माजी नगरसेवक बालाजी काकडे यांचा पोलिसांना फोन आला की रेतीबंदर येथे राहणारा रिक्षा ड्रायव्हर नितीन वाघवसे यांना त्यांच्या रिक्षामध्ये दागिने व कपड्यानी भरलेली बॅग आढळली आहे. त्यानंतर माजी नगरसेवक बालाजी काकडे हे सदर पोलीस स्टेशनला आले. त्या महिलेला पण बोलावण्यात आले आणि दागिन्यांची पडताळणी करून त्या महिलेले दागिने व कपडे परत केले. त्या रिक्षाचालकाचा उचित सन्मान आणि सत्कार करण्यात आला.
माजी नगरसेवक बालाजी काकडे म्हटले कि, रिक्षाचालकाच्या भावाचा मला सकाळी फोन आला. त्यानंतर मी माझ्या विभागाचे शाखा प्रमुख सचिन गोरे यांना सगळीकडे शोधाशोध करायला सांगितली. माझ्या शाखाप्रमुखने सगळी माहिती घेतली तेव्हा त्यांना समजलं की ही बॅग सुनीता शिंदे यांची आहे. मग आम्ही त्या महिलेला आणि रिक्षाचालक नितीन वाघवसे यांना घेऊन कळवा पोलीस स्टेशनमध्ये आलो त्यानंतर चौधरी साहेब यांच्या हस्ते महिलेचे दागिने व कपडे परत करण्यात आले.




