मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) हाती त्याच्यापर्यंत ड्रग्ज पोहोचवणारा ड्रग पेडलर लागला आहे. हरीश खान नावाच्या या ड्रग पेडलरला एनसीबीने वांद्रेमधून अटक केली आहे.
मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 28 मे रोजी सुशांत सिंह राजपूतचा रूम पार्टनर आणि जवळचा मित्र सिद्धार्थ पीठानीला हैदराबादमधून अटक केली होती. एनसीबीने नीरज आणि केशव जे सुशांतचे नोकर होते त्यांची सुद्धा कसून चौकशी केली. या चौकशीनंतर हरीश खान याचं नाव समोर आलं. हरीश खान तोच ड्रग पेडलर आहे, ज्याच्याकडून सुशांत सिंहपर्यंत ड्रग्ज पोहचवले जात होते. सिद्धार्थच्या अटकेनंतर एनसीबीने नीरज आणि केशव या दोघांची चौकशी सुरू केली आणि या प्रकरणी नवे खुलासे होऊ लागले.
हरीश त्याच्या भाऊ शकीब खान सोबत वांद्रे परिसरात ड्रग्सचा व्यापार करत होता. हरीश खानला दाऊद सारखं बनायचं होतं. आपली दहशत कायम ठेवण्यासाठी हरीश खान वांद्रे परिसरातील छोट्या ड्रग पेडलरच अपहरण करायचा आणि त्यांच्याकडे असलेलं ड्रग्स जप्त करुन त्यांना आपल्या टोळीमध्ये काम करण्यास भाग पाडायचा. हरीशसोबत त्याचा भाऊ शाकिब खान याला अटक केली आहे. शाकिबवर 19 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्यामुळे शाकीबला एनसीबीने वांद्रे पोलीसांच्या ताब्यात दिलं आहे.




