अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. सोशल मीडियावरून मिलिंद फिटनेस संदर्भातील अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांना फिटनेससाठी प्रोत्साहन देत असतो. आता मिलिंद सोमणने एक पोस्ट शेअर करत त्याच्या धुम्रपानाच्या सवयीबद्दल आणि त्यावर कसं नियंत्रण मिळवलं याबद्दल सांगितलं आहे.
मिलिंद सोमणने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हटले की धुम्रपान करणं हा मी आजपर्यंत केलेला सर्वात मोठा मूर्खपणा आहे. ‘कॅप्टन व्योम’ या मालिकेच्या शूटिंगवेळी मिलिंदला धुम्रपानाचं व्यसन लागलं होतं. व्यसन लागण्यामागे काहीही विशेष कारण नव्हतं. यावेळी तो ३२ वर्षांचा होता आणि दिवसातून जवळपास ३० सिगारेट ओढायचा. धुम्रपानाचं व्यसन अगदी पटकन लागलं, असं मिलिंद म्हणाला आहे.
View this post on Instagram
मिलिंद त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला की धुम्रपानाचं व्यसन सोडवणं अत्यंत कठीण आहे. व्यसन सोडवण्यासाठी मला खूप वेळ लागला. मात्र सुदैवाने काही चांगल्या सवयींच्या जोरावर मिलिंद सोमणने या व्यसनावर ताबा मिळवला आणि त्याने सिगारेट पूर्णपणे बंद केली. तो म्हणाला, “मी नशीबवान आहे मला इतर अनेक चांगल्या सवयी आहेत. त्यामुळे यातून मी हळूहळू बाहेर पडू शकलो. सगळेच इतके भाग्यवान नसतात.”
तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी जगभरात 80 लाख आणि भारतात १३ लाखाहून अधिक लोक मृत्यूमुखी पडतात
मिलिंद पुढे म्हणाला कि, “तंबाखूमुळे निर्माण होणारा धोका हा जगातील आरोग्यासंबधीचा सर्वात मोठा धोका आहे. जगभरात दरवर्षी ८ दशलक्षाहून अधिक लोकांचा तंबाखूच्या व्यसनामुळे बळी जातो अशी जागतिक आरोग्य संस्थेची आकडेवारी सांगते. दरवर्षी ३१ मे म्हणजेच वर्ल्ड नो टोबॅको डे हा माझ्यासाठी उत्सव असतो. तसेच हा दिवस मला मी आजवर केलेल्या सर्वात मोठ्या मूर्खपणाची आठवण करून देतो ते म्हणजे धुम्रपान.”




