मुंबई : जय भानुशाली आणि माही विज लोकप्रिय कपल आहेत. काही काळापासून माही छोट्या पडद्यावर दिसली नसली तरी ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. जय भानुशाली आणि माही विज तीन मुलांचे पालक आहेत. जय आणि माहीने २०१७ मध्ये राजवीर आणि खुशी या दोन भावंडांचे पालकत्व स्वीकारले होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांची स्वतःची मुलगी ताराचा जन्म झाला. मात्र, मुलीच्या जन्मानंतर त्यांनी राजवीर आणि खुशी या दोन्ही मुलांना सोडून दिल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू असते. अखेर, या सर्व प्रश्नांची उत्तरे माहीने एका मुलाखतीमध्ये दिली आहेत.
माहीने स्पष्ट केले कि, ‘या दोघांना आम्ही दत्तक घेतलेले नाही. तर आम्ही या दोघांचे पालक आहोत. त्यांचे वडील आमच्याबरोबर काम करतात. राजवीर आणि खुशी यांचा जन्म झाल्यापासून ते आमच्यासोबतच आहेत. त्यामुळे ते मला आई आणि जयला बाबा म्हणतात. आम्ही सर्वजण एका आनंदी कुटुंबाप्रमाणे एकत्र राहतो आहोत. परंतु आम्ही या दोघांना दत्तक घेतले आहे, ही गोष्ट कुठून आली हे मलाही कळलेले नाही.’ माही पुढे म्हणाली कि, ‘राजवीर आणि खुशी सध्या त्यांच्या आई- वडिलांसोबत गावी गेले आहेत. कोरोना काळामध्ये गावाला राहणे जास्त सुरक्षित असल्याचे त्यांच्या वडिलांच्या आईचे मत होते. त्यानुसार ते सर्वजण गावाला गेले. ते इथून गेल्यामुळे आमच्या मुलीचा जन्म झाल्यानंतर आम्ही या दोघांना सोडून दिल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत असाव्यात.’




