नवी दिल्ली : जबलपूरला जाणाऱ्या विमानाचे आज सकाळी दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. स्पाइसजेटच्या या विमानात अचानक धूर झाला होता. फ्लाइटमध्ये आग लागण्याची शक्यता लक्षात घेता टेकऑफनंतर काही वेळातच विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर आणावे लागले. सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आल्याचे स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 6.15 वाजता दिल्ली विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच विमानात धुराचे लोट पसरल्याचे सांगण्यात येत आहे. विमान 5000 फूट उंचीवर उड्डाण करत असताना अचानक केबिनमध्ये धुराचे लोट पसरू लागले. विमानात धूर येत असल्याचे पाहून प्रवासी आणि क्रू मेंबर्स घाबरले. धूर पाहिल्यानंतर पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलशी बोलून विमान पुन्हा दिल्ली विमानतळाकडे वळवले. दिल्लीत विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. इमर्जन्सी लँडिंगनंतर विमान रिकामे करण्यात आले. विमानात धूर कसा भरला हे अद्याप समजू शकलेले नाही. तज्ज्ञांनी त्याचा तपास सुरू केला आहे.
On the Delhi-Jabalpur SpiceJet flight #SG_2862, passengers noticed smoke inside the plane today @5000 feet.
The SpiceJet aircraft then returned safely to Delhi airport.@DGCAIndia @flyspicejet pic.twitter.com/QM2uCPT4ju— Capt S R Meena ✈️ (@captessar) July 2, 2022
विमानात धूर भरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्पाइसजेटच्या विमानाला आग लागण्याची गेल्या दोन आठवड्यांतील ही दुसरी घटना आहे. 19 जून रोजी बिहारची राजधानी पाटणाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाच्या इंजिनला आग लागल्याने पाटणा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते.




