नवी दिल्ली : काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड झाली असून, त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांचा पराभव करून विजय मिळवला आहे. सकाळी 10 नंतर सुरू झालेली मतमोजणी दुपारी 1.30 वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर आज काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. एआयसीसीच्या मुख्यालयात मतमोजणी झाली.
काँग्रेसच्या 137 वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी सहाव्यांदा निवडणूक होत असून 24 वर्षांनंतर पहिल्यांदाच काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळाला आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे 7897 मतांनी विजयी झाले, शशी थरूर यांना 1072 मते मिळाली, 416 मते बाद झाली.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले होते. विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत जवळपास 95 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
नव्या अध्यक्षांसमोर मोठी आव्हाने
काँग्रेसचे नवीन अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासमोर पक्षाला उभारी देण्याचे मोठे आव्हान असणार आहे. आपल्या राजकीय अस्तित्वासाठी काँग्रेसला संघर्ष करावा लागत आहे. काँग्रेसला नवचैतन्य देण्याचे आव्हान खर्गे यांच्यासमोर असणार आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणूक आता मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कामगिरीकडे अनेकांचे लक्ष असणार आहे.