नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. बुधवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. ते ८९ वर्षांचे होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते, तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
काही दिवसांपूर्वी पहाडिया यांना कोरोनाची लागण झाली होती. गुडगावच्या एका रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीच्या लोधी रोड स्थित स्मशानभूमीत त्यांच्यावर कोरोना नियमांचे पालन करून अंत्यसंस्कार करण्यात येतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पहाडिया यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
राजस्थान के पूर्व मुख्यमंत्री श्री जगन्नाथ पहाड़िया के निधन से दुःख हुआ। वंचित वर्ग की आवाज़, लोकप्रिय जनसेवक और कुशल प्रशासक, श्री पहाड़िया ने राज्यपाल और केंद्रीय मंत्री के रूप में भी राष्ट्र निर्माण में विशिष्ट योगदान किया। उनके प्रियजनों के प्रति मेरी शोक-संवेदनाएं।
— President of India (@rashtrapatibhvn) May 20, 2021
पहाडिया यांची राजकीय कारकीर्द :
- जगन्नाथ पहाडिया १९५७, १९६७, १९७१ आणि १९८० मध्ये खासदार आणि १९८०, १९८५, १९९९ आणि २००३ मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले होते.
- पहाडिया यांचा इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातही समावेश होता. वित्त, उद्योग, श्रम आणि कृषी यांसारख्या मंत्रालयांची जबाबदारी त्यांनी हाताळली होती.
- ६ जून १९८० ते १४ जुलै १९८१ पर्यंत जगन्नाथ पहाडिया राजस्थानचे मुख्यमंत्री राहिले. १३ महिन्यांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी राज्यात संपूर्ण दारुबंदी जाहीर केली होती.
- पहाडिया यांनी बिहार (१९८९ – १९९०) आणि हरयाणा (२००९ – २०१४) या राज्यांचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिलं होतं.
‘भय इथले संपत नाही’ : आता पांढर्या बुरशीचे रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ




