नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज आठवा दिवस आहे. युद्धग्रस्त भागातून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा चालवले जात आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारला निर्देश द्यावे यासाठी एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, भारत सरकार भारतीयांना बाहेर काढण्याचे काम करत आहे.
भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमना म्हणाले, “आम्हाला विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती आहे, आम्हाला खूप वाईट वाटते. पण आम्ही रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना युद्ध थांबवण्याची सूचना देऊ शकतो का?”
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी माहिती दिली आहे की, ऑपरेशन गंगा अंतर्गत आज 3726 भारतीयांना युक्रेनमधून परत आणले जाणार आहे. ते म्हणाले की, बुखारेस्टहून 8 फ्लाईट, सुसेवा येथून 2 फ्लाईट, कोसिसेहून 1 फ्लाईट, बुडापेस्टहून 5 फ्लाईट आणि रिजजोहून 3 फ्लाईट भारतीय विद्यार्थ्यांना आणि इतरांना परत आणतील.
युक्रेनमधून गुरुवारी मुंबईत आलेल्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, अनेक भारतीय विद्यार्थी अजूनही युद्धग्रस्त देशात अडकले असून त्यांना मदतीची गरज आहे. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथून युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या 183 प्रवाशांना घेऊन एक विशेष विमान गुरुवारी सकाळी मुंबईत पोहोचले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रवाशांमध्ये एका नवजात बालकाचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईला पोहोचलेल्या तिसर्या इव्हॅक्युएशन फ्लाइटचे विमानतळावर स्वागत केले. पहाटे साडेपाच वाजता ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ विमान बुडापेस्टहून येथे पोहोचले.




