नंदुरबार : नंदुरबारमधील धडगाव तालुक्यात राहणाऱ्या एका पित्याने आपल्या मुलीचा मृतदेह तब्बल 42 दिवसांपासून मीठाच्या खड्यात पुरुन ठेवला आहे. मुलीवर 4 जणांनी बलात्कार करुन तिचा खून केला. मात्र, पोलिसांनी फक्त आत्महत्येचा गुन्हा नोंदवला. शवविच्छेदन करतानाही तिच्यावरील अत्याचाराबाबत काहीच तपासणी करण्यात आली नाही, असा आरोप मुलीच्या पित्याने केला आहे. मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आता या पित्याने व्यवस्थेविरोधात लढा सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेने मृत्यूआधी कुटुंबीयांना फोन करून आपल्यावरील अत्याचाराची माहिती दिली होती. याबाबत कुटुंबीयांनी पोलिसांनाही माहिती दिली. मुलीच्या पित्याने सांगितले की, त्यांच्या विवाहीत मुलीला तालुक्यातील वावी येथील रहिवासी रणजीत ठाकरे आणि अन्य एकाने 1 ऑगस्ट रोजी बळजबरीने गाडीवर बसवून गावाबाहेर नेले. मुलीनेच नातेवाईकांना फोन करुन रणजीतसह चार जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगितले. ते मला मारून टाकतील, असे मुलीने फोनवर सांगितले. यानंतर काही वेळातच मुलीने वावी येथे एका आंब्याच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचा फोन आला. मात्र, मुलीचे कुटुंबीय घटनास्थळी पोहचण्याआधीच तिचा मृतदेह खाली घेत पुरावे नष्ट करण्यात आले.
मुलीला फाशी दिली असून पोलिसांच्या मदतीने ती आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न चालला असल्याचा आरोप तिच्या वडीलांसह कुटुबीयांनी केला आहे. मुलीच्या पित्याने आपल्या मुलीचा मृतदेह मिठाच्या खड्ड्यात तो जतन करुन ठेवला आहे. सर्व ग्रामस्थदेखील पीडित कुटुंबीयांसोबत उभे आहेत. केवळ आत्महत्येची नोंद केल्याने मुलीचा मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेहाचे अंतिम संस्कार केले नाही.
मृतदेह मिठाच्या खड्ड्यात पुरल्यानंतर पित्यासह ग्रामस्थांनी धडगाव पोलिस स्टेशनसह पोलिस अधिक्षक कार्यालय गाठले. ठाणे येथील सामाजिक कार्यकर्त्यां परिणीती पोंक्षेंच्या मदतीने थेट मुख्यमंत्री शिंदेंनाही अंतिम संस्कार झाले नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. मुलीच्या कुटुंबीयांच्या मागण्यानंतर प्रशासनाने मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करणे क्रमप्राप्त होते, मात्र अद्याप यावर कार्यवाही झाली नाही.
दरम्यान, तपासादरम्यान जे समोर आले त्यानुसार अतिरीक्त कलमांचा गुन्ह्यात समावेश करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिस अधिक्षकांनी ग्रामस्थांचीही भेट घेतली आहे. तसेच, पीडितेच्या मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करण्याच्या सूचनाही त्यांनी धडगाव पोलिस ठाण्याला दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी तालुका दंडाधिकारी यांना पत्र लिहून पुन्हा शवविच्छेदनाची मागणी केली आहे.