मुंबई : एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा 4 सप्टेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’साठी ही परीक्षा घेतली जाईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’ संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 ही परीक्षा आधी 11 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 9 एप्रिल रोजी एमपीएससीकडून परिपत्रक काढून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा 4 सप्टेंबर 2021 रोजी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने परीक्षेसंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 3 ऑगस्ट रोजी परीक्षेला परवानगी देणारे पत्र प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोगन 4 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येईल, असं स्पष्ट केलं आहे. तसेच, परीक्षेच्या आयोजनासंदर्भात पुढील अपडेट्ससाठी आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेसंदर्भात परिपत्रक जारी
मार्च महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मुंबई पुण्यासह राज्यात आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट–ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता ही परीक्षा 4 सप्टेंबर रोजी होणार आहे.




