मुंबई : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं आहे. या पक्षाने राज्यात केवळ एकच जागा जिंकली आहे. त्याउलट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आठ जागा जिंकून त्यांची ताकद दाखवून दिली आहे. दरम्यान, अजित पवारांच्या गटातील काही नेते आणि आमदार शरद पवारांकडे परतणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अजित पवारांचे काही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अशातच अजित पवार गटाच्या प्रदेश प्रवक्त्या रुपाली ठोंबरे-पाटील पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यांना साद घातली आहे.
ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये रुपाली ठोंबरे यांचा फोटोदेखील आहे. यासह अंधारे यांनी म्हटलं आहे की निष्कलंक चारित्र्य, उत्तम जनसंपर्क, निडरता, रोखठोक, नेत्यांच्या मागेपुढे करून नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या लढाऊ कार्यकर्त्या… तरिही अजून किती दिवस उपेक्षित राहणार? रुपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ… दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या या पोस्टनंतर त्यांनी अप्रत्यक्षपणे रुपाली ठोंबरे यांना अजित पवार गट सोडून ठाकरे गटात येण्याची साद घातल्याची चर्चा रंगू लागली याहे.
निष्कलंक चारित्र्य, उत्तम जनसंपर्क, निडरता, रोखठोक, नेत्यांच्या मागेपुढे करून नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करणारी लढाऊ कार्यकर्ता.. तरीही अजून किती दिवस उपेक्षित राहणार?
रूपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ… @Rupalispeak@ShivSenaUBT_ pic.twitter.com/lQkv4duHkh— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) June 13, 2024




