जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य मुलींशी टवाळखोरांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री रक्षा खडसे यांचे सुरक्षा रक्षक त्यांच्या परिवारासोबत कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेला उपस्थित होते. यावेळी काही तरुणांनी मंत्री यांच्या कुटुंबाचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला. संशयाच्या आधारावर सुरक्षा रक्षकांनी त्या तरुणाच्या मोबाईलची पडताळणी केली. त्यानंतर या तरुणांची सुरक्षा रक्षकांसोबत वादावादी झाली.
रक्षा खडसे आक्रमक :
रक्षा खडसे यांनी या प्रकरणावर आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त करत पोलिसांकडे या तरुणांना लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, इतकी सुरक्षा असताना जर अशी छेडछाड केली जात असेल, तर सामान्य मुलींचं काय होणार? महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे आणि यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. रक्षा खडसे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि पोलिसांसोबत चर्चा केली. याप्रकरणी चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे, आणि आता त्यावर कडक उपाययोजना करण्यात येण्याची आवश्यकता आहे.