पुणे : मशीन ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तर अन्य एक कामगार या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. रविवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास पुण्यापासून 18 किमी अंतरावर असलेल्या वडकी नाला परिसरात स्नूझ हब कम्फर्ट नावाच्या मॅट्रेस निर्मिती युनिटमध्ये ही घटना घडली. मॅट्रेस कारखान्यात दोन कामगार मशीनची आतून साफसफाई करत असताना युनिटमधील एका ऑपरेटरने फोम मिक्सर मशीन चालू केल्याने 20 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला आणि दुसरा कामगार गंभीर जखमी झाला.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास पुण्यापासून 18 किमी अंतरावर असलेल्या वडकी नाला परिसरात स्नूझ हब कम्फर्ट नावाच्या मॅट्रेस निर्मिती युनिटमध्ये ही घटना घडली. मोहम्मद अरसाद अन्सारी (२०) असे मृताचे नाव असून तो झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील रहिवासी होता. दुसरा कामगार कैलास भरत कोल (21) हा मध्य प्रदेशातील उमरिया येथील असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
कोल यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. एफआयआरनुसार, कोल आणि अन्सारी एका मशिनवर काम करत होते जे जुन्या मॅट्रेस फोमचे तुकडे करतात आणि रासायनिक प्रक्रियेचा वापर करून मॅट्रेस फोममध्ये पुनर्वापर करतात. या दोघांना देण्यात आलेले एक काम म्हणजे दररोज सकाळी मशीन साफ करणे आणि नवीन बॅच लोड होण्यापूर्वी शेवटच्या बॅचमधील फोमचे उर्वरित तुकडे काढून टाकणे.
पोलिसांनी सांगितले कि, रविवारी सकाळी 10 च्या सुमारास कोल आणि अन्सारी यांनी मशिनच्या मिक्सिंग एरियामध्ये प्रवेश केला आणि साफसफाई सुरू केली. यावेळी अचानक मशीनचे रोटर्स हलू लागले. अन्सारी रोटरच्या अगदी जवळ होता, त्यामुळे ब्लेडमध्ये अडकला. कोलचा पाय रोटरमध्ये अडकला होता पण त्याने मशीनच्या दरवाजाला धरून ठेवत स्वतःला बाहेर काढण्यात यश मिळवले. अन्सारी मात्र पुढे ओढले गेले, मशिनमध्ये त्यांचे दोन्ही हात व पाय तुटल्याने त्यांचा मृत्यू झाला. कोलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याच्या दोन्ही पायांना डझनाहून अधिक टाके पडले आहेत.
याप्रकरणी, पोलिसांनी मशीन ऑपरेटर अमित बल्लू धुर्वे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तो लोणी काळभोर येथील रहिवासी आहे. त्याच्या निष्काळजीपणामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की धुर्वे याने आतमध्ये कामगार आहेत की नाही याची तपासणी न करताच मशीन चालू केले. त्याच्याविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेला अजून कोणी जबाबदार आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.