पुणे : पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात 17 वर्षीय अमन सिंगच्या क्रूर हत्येची घटना उघडकीस आली आहे. 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी कामासाठी बाहेर पडलेल्या अमनचा त्या दिवसानंतर काहीच मागमूस लागला नव्हता. कुटुंबीयांनी पोलिसांकडे अमन बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला.
तपासादरम्यान पोलिसांना खेड-शिवापूरच्या दुर्गम भागात पुरलेला एका तरुणाचा मृतदेह आढळला. वस्त्रांची जुळवाजुळव आणि ओळख पटविल्यानंतर हा मृतदेह अमन सिंगचाच असल्याचे स्पष्ट झाले.
ही हत्या एका बनावट इंस्टाग्राम अकाउंटचा वापर करून घडल्याचा धक्कादायक तपशील तपासात समोर आला आहे. आरोपींनी एका मुलीच्या नावाने फेक प्रोफाइल तयार करून अमनशी संवाद साधला. त्याला वाटले की तो एका तरुणीशी बोलत आहे. त्यानंतर त्याला कात्रज घाटात भेटण्यासाठी बोलावण्यात आले. 29 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता अमन घाटात पोहोचला तेव्हा चार आरोपी आधीच तिथे लपून बसले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. मारहाणीत अमन बेशुद्ध झाल्यानंतर त्याला खेड-शिवापूरमधील एका निर्जन ठिकाणी नेण्यात आले. तिथे दगड आणि विळ्याने अमनची निर्घृण हत्या करण्यात आली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जमिनीत पुरण्यात आला.
या प्रकरणात बेळगावचे 19 वर्षीय प्रथमेश चिंदू अधिकारी आणि 19 वर्षीय नागेश बालाजी धाबले यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय 16 आणि 17 वर्षीय दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीत आरोपींनी ही हत्या एका जुन्या वादातून आणि सूडातून केली असल्याचे कबूल केले.
पोलिसांनी मोबाईल लोकेशन, तांत्रिक पुरावे आणि सोशल मीडिया विश्लेषणाच्या मदतीने हा गुन्हा उघड केला. पोलिस आता बनावट इंस्टाग्राम अकाउंट मागे कोणाचा मेंदू होता आणि त्याचे तांत्रिक स्त्रोत काय आहेत याचा माग काढत आहेत.
या घटनेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फेक प्रोफाइल्स आणि ऑनलाइन सापळ्यांचे गंभीर धोके पुन्हा एकदा समोर आणले आहेत. पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.




