पुणे : पुणे शहरातील वानवडी परिसरात ज्येष्ठ दाम्पत्याकडे काम करणाऱ्या महिलेने २४ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज तिजोरीसकट चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यानुसार या महिलेच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांची पत्नी हे ज्येष्ठ दाम्पत्य वानवडीतील बोराडेनगर परिसरातील गुलमोहर सोसायटीत राहतात. तक्रारदार परदेशात नोकरी करत होते. सेवानिवृत्तीनंतर ते पुण्यात राहायला आले आहेत. त्यांचा मुलगा दुबई येथे नोकरी करतो. दोन मुली अमेरिकेत आहेत, तर तिसरी मुलगी कोंढव्यात राहते. घरात पती-पत्नी दोघेच राहतात. या दाम्पत्याला घरकाम करण्यासाठी मोलकरीण हवी होती. दरम्यान, त्यांच्या परिचयातील व्यक्तीने त्यांना या महिलेचे नाव सूचवले.
ही महिला २७ जुलै रोजी त्यांच्याकडे काम मागण्यासाठी आली होती. दोन दिवस काम पाहिल्यानंतर त्यांनी तिला कामावर ठेऊन घेतले. त्यानंतर त्यांनी ओळखीचा पुरावा म्हणून तिच्याकडे आधारकार्ड मागितले होते. पण कामाच्या गडबडीत घरी विसरले, असे सांगून तिने वेळ मारून नेली. त्यानंतर दोन दिवस तिने व्यवस्थित काम केले. पण तिसऱ्या दिवशी ती कामावर आलीच नाही. ज्या व्यक्तीने या महिलेचे नाव सुचवले होते, त्यांनी देखील तिचा पत्ता किंवा फोन नंबर नसल्याचे सांगितले. या महिलेने घरात काम करताना संपूर्ण वेळ मास्क वापरल्याने तिचा चेहरा या दाम्पत्याने पाहिलाच नव्हता.
तक्रारदार दाम्पत्याला संशय आल्यामुळे त्यांनी कपाटात ठेवलेली तिजोरी पाहिली. तर तिथे तिजोरी आढळली नाही. चोरीला गेलेल्या तिजोरीला बायोमेट्रिक लॉक आहे. तिजोरीत ५३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ५५ हजार रुपये रोख, ५०० अमेरिकन डॉलर, चार हजार दुबई दिनार व १० हजार रुपयांची तिजोरी असा २४ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव हे अधिक तपास करीत आहेत.




