नाशिकः नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. मिरची चौकात पहाटेच्या सुमारास खासगी बसला अचानक आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी या अपघाताची पुष्टी केली आहे. ही बस यवतमाळहून मुंबईकडे निघाली होती. मात्र वाटेतच बसला आग लागली. या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
जिल्हाधिकारी गंगाधरन डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. तसंच, बचावकार्य सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. दहा मयत पुरुष आहेत तर २१ प्रवाशी जखमी आहे. यापैकी एकजण गंभीर जखमी आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयातून दुसरीकडे पुढील उपचारांसाठी हालवण्यात येणार आहे.
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही यवतमाळहून मुंबईकडे निघालो होतो. सकाळी झोपेत असताना गाडी दुसऱ्या गाडीला धडकली. काही समजण्यापूर्वीच आग लागली. मी खिडकीतून उडी मारत बाहेर निघाल्याने जीव वाचला. सोबत तीन लहान मुली होत्या. सुदैवाने त्यांचेही प्राण वाचले. अग्निशमन यंत्रणा वीस मिनिटांनी पोहोचली.




