नागपूर : राज्याच्या उपराजधानी नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात साताऱ्याच्या फलटण येथील तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा मुद्दा सभागृहात गाजला. विरोधकांच्या प्रश्नांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील तपासाची सविस्तर माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले, “फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर आम्ही SIT ने तपास सुरू केला आहे. न्यायालयीन चौकशीदेखील सुरु असून, फॉरेन्सिक अहवालानुसार, तिच्या हातावर लिहिलेली नोंद तिचे स्वतःचे हस्ताक्षर असल्याचे निष्पन्न झाले आहे.”
या घटनेने राज्यभरात खळबळ उडवली होती. या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरही गंभीर आरोप झाले होते. त्यामुळे विरोधकांनी या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप केला होता.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “या प्रकरणात पोलीस अधिकारी बदनेने डॉक्टर तरुणीची फसवणूक केली आणि तिचे शारीरिक शोषण केले. लग्नाचे आमिष दाखवून त्याने नंतर वेगळी भूमिका घेतली.”
ते पुढे म्हणाले, “आत्महत्येच्या मागे बदनेची फसवणूक आणि दुसऱ्या आरोपीने परिस्थितीचा फायदा घेतल्याची कारणं होती. महिला डॉक्टरने दोघांची नावे हातावर लिहून आत्महत्या केली. फॉरेन्सिक अहवालानुसार, गळफास घेऊन आत्महत्येची नोंद आहे. तपास अजून पूर्ण झालेला नाही, चार्जशीट लवकरच दाखल केली जाईल. समांतरपणे न्यायमूर्तींच्या माध्यमातून अनेक बाबींची चौकशीही सुरू आहे. महिला IPS अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे.”
मुख्यमंत्र्यांनी डिजिटल आणि तांत्रिक पुराव्यांबाबतही माहिती दिली, “व्हॉट्सॲप चॅट्स आणि CCTV फुटेज पोलिसांकडे आहेत. महिला डॉक्टर शेवटच्या दिवशी हॉटेलमध्ये आली, रूममध्ये गेली याचे सर्व फुटेज उपलब्ध आहेत. नवीन कायद्यानुसार फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत. पडताळणी सुरू आहे. ६० दिवसांत चार्जशीट दाखल केली जाईल. आरोपी व्यतिरिक्त इतर कोण सहभागी आहे की नाही या माहितीसाठी न्यायालयीन चौकशी सुरू आहे.”




