मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. शिंदे सरकारच्या बाजूने एकूण 164 मते पडली तर विरोधात केवळ 99 मते पडली. दरम्यान, सोमवारी महाराष्ट्र विधान भवनात झालेल्या फ्लोअर टेस्टनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात भाषण केले. फडणवीस यांनी भाषणात विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, मी परत येईन असे एकदा म्हणालो होतो. त्यावरून अनेकांनी माझी चेष्टा केली. आज मी परत आलो आणि इतरांना पण सोबत घेऊन आलो.
माझा बदला म्हणजे मी त्यांना माफ केले : फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हाच मी म्हणालो होतो की हे सरकार अनैसर्गिक आहे, हे सरकार टिकणार नाही. त्यावेळी मी एक कविता म्हटली होती, ‘मी पुन्हा येईन’. त्यावर माझी खूप टिंगल-टवाळी अनेकांनी केली. पण मी आलो, आणि एकटा नाही आलो, इतरांनाही सोबत घेऊन आलो. ज्यांनी मस्करी केली आणि अपमान केला त्यांचा मी बदला घेणार आहे. माझा बदला असा आहे की मी त्यांना माफ केले. राजकारणात प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नसते. प्रत्येकाची संधी येते.”
मी पुन्हा आलो…
आणि
इतरांना पण सोबत घेऊन आलो..#Maharashtra pic.twitter.com/SvPuPyQvTi— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 4, 2022
मी एक दिवस परत येईन
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस नाट्यमय पद्धतीने पाच दिवस राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र नंतर राष्ट्रवादीने पाठिंबा काढून घेतल्याने त्यांचे सरकार पडले. सरकार स्थापन झाल्यानंतर पाच दिवसांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी एक दिवस परत येईन’, असे म्हटले होते.




