मुंबई : मुंबईतील गोरेगाव येथील मोतीलाल नगर येथील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
म्हाडाच्या गोरेगाव (प.) येथील मोतीलाल नगर 1, 2 व 3 येथे सुमारे 50 हेक्टर ऐवढ्या जागेवर गाळ्यांची अंदाजित संख्या 3700 व झोपड्यांची संख्या अंदाजे 1600 अशी एकत्रित 5300 इतकी आहे. मोतीलाल नगर वसलेल्या जागेचे एकूण क्षेत्रफळ लक्षात घेता, गाळ्यांची घनता 106 गाळे प्रति हेक्टर आहे. ही घनता बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 च्या विनियम 30 (बी) नुसार 450 गाळे प्रति हेक्टरपेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे प्रत्यक्षात तेथे पुनर्विकासास मुबलक जागा उपलब्ध आहे. शिवाय, सध्या तेथे अस्तित्वात असलेल्या रहिवाशांना त्यांनी धारण केलेल्या गाळ्यांच्या क्षेत्रफळापेक्षा मुबलक मोकळी जागा वापरण्यास उपलब्ध आहे.




