मुंबईतील विशेष कोर्टाने लैंगिक अपराधांविषयी संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत एका 65 वर्षीय व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या व्यक्तीला त्याच्या मुलीवर आणि अल्पवयीन नातीवर बलात्कार केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरविले आहे. पीडित महिलेने कोर्टासमोर केलेल्या निवेदनात म्हटले की ती 15 वर्षाची असल्यापासून तिचे वडील तिच्यावर बलात्कार करीत होते.
पीडित महिलेने सांगितले की लग्नानंतरही ती तिच्या आई-वडिलांबरोबर राहत होती. तिच्या वडिलांनी तिला धमकी दिली होती की तिने कुणाला याबाबत सांगितले तर तो तिच्या मुलांना इजा करेल. महिलेच्या म्हणण्यानुसार, ती आपल्या आईबरोबर घरकाम करायची. तर तिचे वडील, भाऊ आणि नवरा चित्रकार होते. या महिलेने कोर्टाला असेही सांगितले की तिने शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीला तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल सांगितले होते. त्या व्यक्तीचे नंतर निधन झाले. त्यानंतर तिने इतर कोणालाही याबद्दल सांगितले नाही.
या महिलेने कोर्टात सांगितले की 2017 मध्ये एक दिवस, दुसर्या वर्गात शिकणाऱ्या तिच्या मुलीने तिला सांगितले की रात्री आजोबा जेव्हा तिच्याबरोबर झोपतात तेव्हा ते तिच्याशी गैरवर्तन करतात. त्यानंतर मुलीने तिला सविस्तर सर्व काही सांगितलं. मुलीकडून हे सर्व ऐकल्यानंतर महिलेने तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तिच्या वडिलांविरुध्द गुन्हा दाखल केला.
सर्व पुरावे व युक्तिवादानंतर न्यायाधीश रेखा एन. पांढरे यांना आरोपी भादंवि कलम 376 (२) (बलात्कार) आणि पॉक्सो कायद्यांतर्गत दोषी आढळला. कोर्टाने या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा आणि दंडही ठोठावला. आरोपीला मुलीला 5०,००० रुपये आणि नातीला 25,००० रुपये भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.




