मुंबई : केंद्रीय अन्वेषण ब्युरो(CBI)ने मुंबईतील एका टीव्ही कलाकाराविरोधात POCSO आणि IT कायद्यांतर्गत केस दाखल केली आहे. हा टीव्ही कलाकार आंतरराष्ट्रीय स्तरावर सेक्स रॅकेट चालवत होता. आरोपी परदेशातील अल्पवयीन मुलांचे अश्लील फोटोज आणि इतर बरंच काही लाच देऊन आणि ब्लॅकमेल करून इन्स्टाग्रामवरून मिळवत होता आणि ते परदेशी ग्राहकांना विकत होता.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपी कलाकाराने अमेरिका, युरोप आणि दक्षिण आशियाई देशातील १० ते १६ वर्षे वयोगटातील तब्बल एक हजार अल्पवयीनांशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संपर्क केला. एजन्सीने आरोपीच्या घराची तपासणी केली तेव्हा त्याचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की त्याच्याकडून लैंगिक शोषणाबाबतचे अनेक साहित्य हाती लागले. आरोपी व्हॉट्सअॅप अन्य प्लॅटफॉर्मचा वापर करून हे साहित्य आंतरराष्ट्रीय ग्राहकांना देत असे. हा आरोपी हरिद्वार येथील राहणारा आहे. तो अल्पवयीनांना ऑनलाईन संबंधांसाठी फूस लावून अश्लील फोटोज आणि व्हिडिओज पाठवण्यास सांगे. याचा वापर तो अवैध धंद्याच्या जाळ्यात त्यांना फसवण्यासाठी करत असे.
सीबीआय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आरोपी मुलांचा व्हॉट्सअॅप नंबर घेत त्यांच्याशी चॅट करत असे तसेच व्हिडिओ कॉल दरम्यान त्यांना अश्लील चाळे करण्यास सांगे जे तो इन्स्टाग्रामच्या माध्यमातून विविध देशांमधील ग्राहकांना शेअर करत असे. जर पीडित अल्पवयीनाने त्या आरोपीशी संपर्क तोडण्याचा प्रयत्न केला तर आरोपी त्यांचे फोटोज कुटुंबीय मित्रपरिवाला शेअर करत असे.