MTDC is getting ready to serve tourists after the ban, online training for staff

प्रतिबंधानंतर पर्यटकांच्या सेवेसाठी एमटीडीसी होतेय सज्ज, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : सध्याच्या साथीच्या काळामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (Maharashtra Tourism Development Corporation -MTDC) पर्यटक निवासात साफसफाई, दुरुस्ती आणि निर्जंतुकीकरणाची कामे सुरु आहेत. त्याचबरोबर आता सध्याच्या प्रतिबंधात्मक कालावधीत एमटीडीसीमार्फत सर्व कर्मचाऱ्यांना विविध विषयांवर ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांच्या संकल्पनेतून आणि उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या नियोजनानुसार ही प्रशिक्षणे आयोजित करण्यात आली आहेत. महामंडळाचे पुणे प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी ही माहिती दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एमटीडीसी आणि पुणे येथील महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रशिक्षणे होत आहेत. या कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत फ्रंट ऑफिस मॅनेजमेंट, हाऊस कीपिंग आणि फूड ॲण्ड बेवरेजेस याबाबतचे आधुनिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणाअंतर्गत ॲटिट्युड बेस ट्रेनिंग आणि पँडेमिक बेस्ड ट्रेनिंगसह प्रात्यक्षिकही घेण्यात येत आहे. पर्यटकांना आनंदी ठेवणे, उच्च दर्जाच्या सुविधा पुरविणे, स्वत:ची स्वच्छता आणि परिसराची साफसफाई, खोल्यांचे निर्जंतुकीकरण, पर्यटकांच्या आरोग्याची सर्वोच्च काळजी घेणे याचा समावेश प्रशिक्षणामध्ये करण्यात आला आहे. प्रशिक्षण दोन आठवड्याचे असून विषयातील तज्ञ प्रशिक्षकांमार्फत मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. 500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

दरम्यान, सध्या पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देत शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन महामंडळाच्या पर्यटक निवासात करण्यात येत आहे. उपहारगृह, रिसॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. पर्यटक निवासात पर्यटकांना आयुर्वेदि‍क काढा, व्हिटॅमिन सी आणि डी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांसाठी मुखपट्टी, फेसशिल्ड, हातमोजे इ. व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाविरोधातील लढाईचा एक भाग म्हणून कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. महामंडळाच्या उपहारगृहामध्ये गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्यांच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत