लॉकडाउननंतर अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली असून टप्प्याटप्प्यानं राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. “पुढील काही दिवसांत राज्यात टप्प्याटप्प्यानं शाळा, धार्मिक स्थळं, व्यायामशाळा उघडण्यात येणार आहेत. तसंच नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल अशी अपेक्षा करू. कोरोना विषाणूवर अद्यापही लस आलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबत जगावं लागणार आहे. आपल्याला काही नियम आणि शिस्त ही पाळलीच पाहिजे,” असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात करोना बाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून टेली आयसीयू प्रकल्प त्यासाठी उपयुक्त ठरत आहे. त्याच्या मदतीने कोरोनामुळे होणारा मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगत टेलीआयसीयूचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात विशेषज्ञांची जाणवणारी कमतरता टेलीआयसीयू तंत्रज्ञानामुळं काहीशी भरून निघणार असून कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर विशेष तज्ञांच्या मार्गदर्शनातून उपचार झाले तर मृत्यूदर कमी होण्यासाठी त्याचा लाभ होईल.
आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ही चिंतेची बाब असून मृत्यूदर एक टक्क्यापेक्षाही कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. डॉक्टरांनी या औषधाचा सर्रास वापर न करता जपून आणि ज्यांना आवश्यकता आहे अशा गंभीर रुग्णांसाठी ते वापरावं, असं आवाहन देखील आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केलं.




