नाशिक : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात 21 दिवस झाले तरी अद्याप एफआयआर दाखल झाली नाही. सरकार, पोलिस प्रशासन बलात्काऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सगळे पुरावे असतानाही पोलीस आणि सरकार कशाची वाट पाहत आहे. मला विश्वास आहे की, आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी असते तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्लं असतं. मुख्यमंत्री साहेब, खरंच खुर्ची एवढी वाईट आहे का? भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा सवाल केला आहे.
“ती महाराष्ट्राची लेक होती. एवढे सारे पुरावे असताना देखील कारवाई होत नाही, हे तर नामर्द सरकार आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली. पूजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड या नावाच्या व्यक्तीचे 45 मिस्ड कॉल होते. हा संजय राठोड कोण आहे याचे उत्तर द्यावे. तसेच 12 ऑडिओ क्लिपबाबात अजून काही स्पष्टता नाही. पुण्यांच्या आयुक्तांकडे एकाही प्रश्नाचे उत्तर नाही.
“मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, साहेब तुमच्यावर प्रेशर नाही ना? धनंजय मुंडेंना सोडलं, आता राठोडला सोडण्यासाठी दबाव तर नाही ना. साहेब ही खुर्ची इतकी वाईट आहे का हो? की या खुर्चीपुढे बाईची इज्जत नाही. आपण शिवयारायांचा महाराष्ट्र म्हणता ना मग आता तो कृतीतून दाखवायची वेळ आली आहे. मुख्यमंत्री महोदय, या बलात्काऱ्याला हालकून द्या, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि दाखवून द्या महाराष्ट्राला की या राज्यात लेकी बाळांच्या अब्रुला हात घालाल तर तुमची गय करणार नाही, असंही चित्रा वाघ म्हणाल्या. तसंच राजीनामा घेईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आम्ही तोपर्यंत लढत राहणार, आणि बोलतच राहणार”, असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे.
पूजा चव्हाण आत्महत्येशी संबंधित संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे राज्यभर आंदोलन सुरु केलं आहे. भाजप संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाल्याचं दिसत आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपच्या महिला मोर्चाने मुलुंड टोल नाक्यावर चक्का जाम आंदोलन केलं.