राज्यात फटाक्यांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांना बंदी घालण्याची भूमिका आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी मांडली आहे.
“फटाकेमुक्त दिवाळी आपल्याला कशी साजरी करता येईल ही मानसिकता आतापासून ठेवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांकडे आणि कॅबिनेटमध्येही मी याबाबत आग्रह धरणार आहे”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. “फटाक्यांच्या धुरात टॉक्झिसिटी खूप असते. थंडीमुळे तो धूर वर जाऊ शकणार नाही. त्यामुळे श्वसनाला अधिक बाधा निर्माण होऊ शकते. यासंदर्भात अधिक काळजी घेतलेली बरी आहे, यासाठीच दिवाळीपूर्वीपर्यंत हा नियम लागू करण्याचा माझा आग्रह राहील”, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या दुसऱ्या संभाव्य लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी नागरिकांना केले.