जळगाव: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड केली गेली आहे. छेडछाड झाल्यानंतर रक्षा खडसे थेट पोलिस ठाण्यात पोहोचल्या आहेत. काही टवाळखोर मुलांनी तिच्या मनाविरोधात फोटो काढले. छेडछाड करणाऱ्या चार मुलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रक्षा खडसे यांच्या मुलीसोबतच इतर मुलींची देखील छेडछाड केली असल्याचे रक्षा खडसे यांनी म्हटले आहे. ज्यांनी छेडछाड केली, त्या मुलावर आधीच चार गुन्हे दाखल आहेत.
या घटनेबद्दल बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, “मुक्ताईनगर येथील यात्रेतील हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. हे टवाळखोर नसून ते गुंड आहेत. त्यांच्या विरोधात आधीही काही गुन्हे दाखल आहेत. त्या मुली ज्यावेळी यात्रेत हजर होत्या, त्यावेळी पोलिस देखील तिथे हजर होते. पोलिसांनी त्या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या गुंडांनी पोलिसांनाही मारहाण केली. पोलिसांना शिवीगाळ केली. पोलिसांनी या गुंडांवर 353 चा गुन्हा दाखल केला आहे. हा एक प्रश्न माझ्या घरामध्ये घडलेला नाही, हा एक सामाजिक प्रश्न आहे. महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडत आहेत. अनेक घटनांची नोंद होत नाही, किंवा महिला त्या ठिकाणी तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. तक्रार न झाल्यामुळे अशा घटना उघडकीस येत नाहीत. या घटनेत रक्षा खडसे यांची मुलगी स्वतः तक्रार करण्यासाठी पुढे आली, हे फार मोठे आहे. अन्यथा, बहुतेक मुली तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी दिली.
मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या चार-पाच वर्षांत जी गुंडगिरी वाढली आहे, त्या बाबत मी अनेक वेळा विधान परिषदेत आवाज उठवला, परंतु याकडे लक्ष दिले गेले नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.