छत्रपती संभाजीनगर : शरीरसुखाला नकार दिल्याने एका १९ वर्षीय मुलाने भावकीतल्याच ३६ वर्षीय महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पीडितेला तब्बल २८० टाके पडले आहेत. याप्रकरणी १९ वर्षीय हल्लेखोर अभिषेक नवपुते याला पोलिसांनी अटक केली आहे. शरीरसुखाला नकार दिल्याने १९ वर्षांच्या तरुणाने जवळपास आपल्या वयाच्या दुप्पट असलेल्या महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चिखलठाणा पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. १९ वर्षीय आरोपी अभिषेक नवपुते याने, भावकीतील एका ३६ वर्षीय महिलेजवळ शरीरसुखाची मागणी केली. तू नाहीतर तुझ्या भावजयीशी माझे शरीरसंबंध जुळवून दे अशी मागणी अभिषेकने केली होती. परंतु त्याच्या मागणीला कोणताही प्रतिसाद न देता पीडीत महिलेने फोन ठेऊन दिला. यामुळे राग अनावर झाल्याने रविवारी संध्याकाळी पीडित महिला शेतातून घरी जात असताना चिडलेल्या अभिषेकने वाटेत तिला अडवले. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. परंतु तिने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे वाद घालत अभिषेकने तिचे केस ओढले आणि तिला मारहाण केली. त्यानंतर आरोपीने सोबत आणलेल्या कटरने तिच्यावर सपासप वार केले. महिलेच्या संपूर्ण चेहऱ्यावर, मांडीवर देखील वार करण्यात आले. एक वार तब्बल सव्वा दोन फुटाचा आहे.
या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून पीडित महिलेवर छत्रपती संभाजीनगर मधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारादरम्यान महिलेच्या शरीरावर तब्बल २८० टाके घालण्यात आले आहेत. सदर प्रकरणात चिखलठाणा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर १९ वर्षांचा आरोपी अभिषेक नवपुते याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.