Care should be taken that the beneficiary is not deprived in distribution of 'Anandacha Shidha': Minister Chhagan Bhujbal
नाशिक महाराष्ट्र

‘आनंदाचा शिधा’ वाटपात लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी – मंत्री छगन भुजबळ

नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या पुरवठा विभागामार्फत राज्यातील एक कोटी 57 लाख ‘आनंदाचा शिधा’ संच वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला आनंदाचा शिधा मिळेल, त्यापासून कोणीही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधित अधिकऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह येथे आनंदा शिधा वाटपाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास पुरवठा विभागाच्या उपायुक्त प्रज्ञा बढे-मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, नायब तहसीलदार निरांजना पराते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे आदी उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एक कोटी 57 लाख लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा संचाचे वाटप होणार असून त्याचा राज्यातील साधारण साडेसात कोटी जनतेला लाभ होणार आहे. जिल्ह्यातील साधारण सात लाख ७८ हजार लाभार्थ्यांना शिधा संच वाटप करण्यात येणार आहे. या आनंदाचा शिधा संचात एक किलो रवा, एक किलो चना डाळ, एक किलो साखर व एक लिटर खाद्यतेल या चार शिधा जिन्नसांचा समावेश आहे. हा संच प्रति शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे १०० रुपयांत वितरित केला जाणार आहे. राज्यातील गोर गरीब जनतेला लाभ मिळवून देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असून या आनंदाचा शिधाच्या माध्यमातून गोरगरिबांना ऐन सणासुदीत दिलासा मिळणार आहे.

येवला तालुक्यात १४० स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील, पिवळे, केसरी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा संचांचे वाटप करण्यात येणार आहे. येवला तालुक्यातील अंत्योदय योजनेतून ९ हजार ५८६ व प्राधान्य योजनेतून २८ हजार ४१४ अशा साधारण 38 हजार लाभार्थ्यांना या शिधा संचाचा लाभ होणार आहे, असेही मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

ओबीसींसाठी राज्यात १२ लाख घरे बांधण्यात येणार असून त्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने १२ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे ही त्यांनी सांगितले. या कार्यक्रम प्रसंगी ५०० नवीन रेशन कार्डचेही वाटप करण्यात आले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत