अमरावती : उपचार म्हणून तान्ह्याबाळाला चटके दिल्याची संतापजनक घटना अमरावतीतून समोर आली आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावातील ही एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना आहे. बाळाच्या कुटुंबियांनी घरगुती उपाय म्हणून विळा गरम करून त्याच्या पोटावर ६५ वेळा डाग दिले. या उपचाराने बाळाच्या शरीरावर गंभीर जखमा होऊन त्याची प्रकृती अधिक बिघडली.
सिमोरी गावातील रहिवाशी बेबी ऊर्फ फुलवंती राजू धिकार यांना २२ दिवसांचे बाळ आहे. सदर बाळ हे आजारी पडल्याने नातेवाइकांनी त्या बाळाच्या पोटावर विळा गरम करून अक्षरशः ६५ वेळ चटके दिले. या अघोरी उपचारामुळे बाळाच्या शरीरावर गंभीर जखमा होऊन बाळाची तब्येत आणखी खालावली. बाळाच्या श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे नातेवाइकांनी त्याला हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर त्याला अचलपूर आणि मग अमरावती येथील डफरीन रुग्णालयात हलवण्यात आले.
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. या प्रकाराने बाळाच्या जीवनाला मोठा धोका निर्माण केला आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे की, एका अत्यंत लहान बाळासाठी अशा प्रकारचे उपचार केले गेले. बाळाची प्रकृती नाजूक असून त्याच्यावर योग्य उपचार तातडीने व्हावेत याकरिता नागपूरला रेफर केले जाऊ शकते असे डॉक्टर म्हणाले.
वास्तविक, श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या बाळासाठी योग्य आणि तातडीचे उपचार आवश्यक होते, परंतु त्याऐवजी अघोरी उपाय वापरल्याने बाळाची प्रकृती अधिक खराब झाली. डॉक्टर्सच्या मते, बाळाला योग्य वेळी योग्य उपचार देण्यात आले असते, तर त्याची प्रकृती नाजूक झाली नसती.