बुलढाणा : भाजपाच्या एका महिला आमदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी आल्याची घटना ताजी असतानाच बुलढाण्यातील चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांना थेट पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. श्वेता महाले यांच्या निवासस्थानी हे धमकीचे पत्र पाठवण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी दिली असून पत्रात अतिशय खालच्या पातळीची भाषा वापरली आहे. श्वेता महाले यांना हे पत्र कोणी पाठवले आणि त्यांच्या निवासस्थानापर्यंत हे कसे पोहोचले याबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही. श्वेता महाले दुपारच्या वेळी आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत चिखली पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुलढाण्यातील देऊळगावच्या मही येथूनच धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता. पोलिसांनी मही येथून दोन जणांना अटक केली. एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या धमकीनंतर आरोपींना अवघ्या काही तासांमध्ये पकडण्यात पोलिसांना यश मिळाले.
अशा प्रकारच्या घटनांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तणावपूर्ण होऊ शकते. यामुळे लोकशाही प्रणालीवर गंभीर परिणाम होऊ शकतात, आणि प्रत्येक राजकीय व्यक्तीला तसेच सामान्य नागरिकांना सुरक्षिततेची हमी देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.




