रायगड : रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात सोशल मीडियावर सुरू झालेल्या प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या एका थरकाप उडवणाऱ्या खून प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पत्नीनेच आपल्या प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे समोर आले असून पोलिसांनी केवळ २४ तासांत गुन्ह्याची उकल केली आहे.
मृत व्यक्तीचे नाव कृष्णा नामदेव खंडवी (वय 23, रा. गौळवाडी, पाबळ, पेण) असे आहे. त्याचा खून त्याची पत्नी दिपाली अशोक निरगुडे (19) हिने आपल्या प्रियकर उमेश सदु महाकाळ (21) आणि मैत्रीण सुप्रिया चौधरी (19) यांच्या मदतीने केला. या तिघांना नागोठणे पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिपालीचे पती कृष्णाशी संबंध ताणलेले होते. त्यातच काही महिन्यांपूर्वी तिची ओळख सोशल मीडियावर उमेश महाकाळ या तरुणाशी झाली. हळूहळू दोघांचे ‘इंस्टाग्राम प्रेम’ वाढत गेले आणि त्यांनी कृष्णाला संपवण्याचा कट रचला.
यासाठी त्यांनी “वारगुडे” या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते तयार केले. या खात्यामार्फत कृष्णाशी संवाद साधून त्याला “मैत्रिणी”च्या नावाखाली जाळ्यात ओढण्यात आले. १० ऑक्टोबर रोजी आरोपींनी कृष्णाला नागोठणे एस.टी. स्टँडवर बोलावले. त्यानंतर त्याचे अपहरण करून वासगावच्या जंगलात नेण्यात आले. तिथे ओढणीने गळा आवळून त्याचा खून करण्यात आला. खूनानंतर ओळख पटू नये म्हणून आरोपींनी त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकले तसेच मोबाईल फोडून पाली रोडलगत फेकून दिला.
तांत्रिक तपासातून आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
सुरुवातीला हे प्रकरण बेपत्ता म्हणून नोंदवण्यात आले होते. मात्र, नागोठणे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशन यांच्या आधारे तपासाची दिशा बदलली. तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले आणि अखेर तिघेही जाळ्यात अडकले.
आरोपी पत्नीची कबुली
पोलिस चौकशीत आरोपी दिपालीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पतीकडून त्रास होत असल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली होती. त्यामुळे तिने प्रियकर उमेशच्या मदतीने पतीला संपवण्याची योजना आखली होती. या कटात तिची मैत्रीण सुप्रिया देखील सहभागी होती.
पोलिसांची जलद कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, आणि उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा तपास अत्यंत व्यावसायिक आणि वेगाने केल्याने नागोठणे पोलिस ठाण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिसांचा नागरिकांना इशारा
“सोशल मीडियावर अपरिचित व्यक्तींशी संवाद साधताना सावध राहा. कोणतीही संशयास्पद माहिती किंवा हालचाल दिसल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा,” असे आवाहन रायगड पोलिसांकडून करण्यात आले आहे.




