मुंबई : शालेय शिक्षणमंत्री वर्षा यांनी दहावी-बारावी बोर्ड परिक्षेबाबत बैठक घेतली. या बैठकीत पालक संघटना, शिक्षक तसेच बोर्ड आणि शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी बोर्ड परिक्षेबाबत पालक, शिक्षकांचे म्हणणे जाणून घेतले. बोर्ड परीक्षांबाबत सर्व बाजूने चर्चा करून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पालकांच्या शंकांचे निरसन केले.
पालकांनी परीक्षा ऑनलाइन घेता येईल का ? हा प्रश्न उपस्थित केला. यावर शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले की परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नसून, गावखेड्यात कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आहे व लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे यामध्ये शक्य नाही. शिवाय, सर्व विद्यार्थ्यांचा विचार करता बोर्डाला निर्णय घ्यावा लागणार त्यामुळे परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घ्याव्या लागणार आहेत.
दहावी बारावी बोर्डाच्या परिक्षेच्या वेळापत्रकात बदल करणे शक्य नाही. कारण वेळापत्रकबाबत आपण हरकती आणि प्रश्न उपस्थित करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानंतर सर्व बाजूने विचार करून हे वेळापत्रक तयार केले आहे. जर काही विद्यार्थी अडचणीमुळे किंवा कोव्हिडमुळे परीक्षा देऊ शकले नाही. तर लगेच आपण त्यांची परीक्षा घेणार आहोत. ही परीक्षा झाल्यावर लगेच पुढील परीक्षा घेण्याचे नियोजन करणार आहोत त्यामुळे विद्यार्थी पालकांनी चिंता करण्याची गरज नाही, असेदेखील शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा कोरोना प्रादुर्भाव पाहता लेखी परीक्षानंतर घेण्याचा सुद्धा विचार शिक्षण विभाग करत आहे. परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रमामध्ये ऐनवेळी बदल होणे शक्य नाही. त्यामुळे ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाचा विचार बोर्डाने केला आहे. परीक्षा आयोजन आणि नियोजनाबाबत सल्लागार समिती परिस्थितीचा आढावा घेऊन व विचार करून निर्णय घेत आहे, असंही शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं.