मुंबई : टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) यंदा अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून तब्बल ४२,००० फ्रेशर्सची भरती करणार असल्याची घोषणा केली आहे. ही भरती मागील वर्षी दिलेल्या वचनबद्धतेनुसारच करण्यात येणार असून, कॅम्पस भरतीचा वेग कायम ठेवण्याचा कंपनीचा निर्धार आहे.
टीसीएसने आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या चौथ्या तिमाहीत ६२५ नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली असून, यानंतर एकूण कर्मचारीसंख्या ६,०७,९७९ इतकी झाली आहे. संपूर्ण वर्षात कंपनीने ६,४३३ कर्मचाऱ्यांची निव्वळ भरती केली आहे, जी मागील वर्षीच्या १३,२४९ कर्मचाऱ्यांच्या निव्वळ तोट्याच्या तुलनेत सकारात्मक पाऊल मानली जात आहे.
पगारवाढ स्थगित, परंतु परिवर्तनीय वेतन कायम
कंपनीने एप्रिलपासून लागू होणारी वार्षिक पगारवाढ सध्या स्थगित केली आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे जागतिक मॅक्रो इकॉनॉमिक अनिश्चितता आणि अमेरिकेतील बदलते टॅरिफ धोरण आहे. पगारवाढीबाबत ठोस तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, टीसीएसने स्पष्ट केले आहे की परिस्थिती स्थिर झाल्यानंतर आणि दृष्टीकोन स्पष्ट झाल्यावर, आर्थिक वर्षाच्या अखेरीस पगारवाढ दिली जाईल.
दरम्यान, कंपनीने तिमाही परिवर्तनीय वेतन योजना सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चौथ्या तिमाहीत ७०% कर्मचाऱ्यांना पूर्ण परिवर्तनीय वेतन मिळणार असून, उर्वरित कर्मचाऱ्यांना कंपनीच्या व्यवसाय कामगिरीच्या आधारे वेतन दिले जाईल.
महसुलात वाढ, मात्र निव्वळ नफ्यात थोडी घट
टीसीएसने चौथ्या तिमाहीत १२,२२४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे, जो मागील वर्षाच्या त्याच तिमाहीच्या १२,४३४ कोटी रुपयांच्या तुलनेत १.७% ने कमी आहे. मात्र, महसुलात ५.३% वाढ झाली असून, तो ६४,४७९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. संपूर्ण आर्थिक वर्षासाठी, कंपनीचा निव्वळ नफा ४८,५५३ कोटी रुपये झाला आहे, ज्यात ५.८% वाढ झाली आहे.
CEO कृतिवासन यांचा इशारा
कंपनीचे CEO के. कृतिवासन यांनी स्पष्ट केले की, “आमच्या ग्राहकांच्या खर्चाच्या पद्धतींमध्ये आधीच तणावाची लक्षणं आमच्या निदर्शनास आली आहोत. जर हे असेच चालू राहिले, तर विवेकाधीन खर्चात विलंब होऊ शकतो.” त्यांनी पुढे सांगितले की, बदलत्या टॅरिफ संदर्भात ग्राहकांकडून बजेटचे पुनर्मूल्यांकन सुरू असून त्यामुळे काही प्रकल्पांमध्ये विलंब आणि मंद गती अनुभवायला मिळत आहे.




