नागपूर : नागपूरच्या रामनगर चौकात दिवसाढवळ्या हत्येची भयंकर घटना घडली आहे. फुटपाथवरील दुकान थाटण्यावरून सुरु झालेला वाद एका व्यक्तीच्या जीवावर बेतला आहे. भररस्त्यात भाजी विक्रेत्याने त्याच्या एका साथीदारासह गॅरेज चालकाची हत्या केली. मृत व्यक्तीचे नाव विशाल निकोसे (वय ३७, रा. पांढराबोडी) असे आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील अंबाझरी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या रामनगर चौकात ही घटना घडली. आरोपींमध्ये किशन रमेश तिवारी आणि त्याचा मित्र निलेश सरोदे यांचा समावेश आहे. विशाल हा गेल्या १८ वर्षांपासून रामनगर येथील फूटपाथवर गॅरेज चालवत होता, तर आरोपी किशन तिवारी हा गेल्या ७ वर्षांपासून त्याच्या शेजारी भाजीचं दुकान चालवत होता. मात्र, गेल्या वर्षभरापासून दोघांचाही जागेवरून वाद सुरू होता. शुक्रवारी दुपारीही त्यांच्यात वाद झाला आणि याच वादातून किशनने त्याचा मित्र नीलेश याच्यासोबत मिळून लोखंडी रॉडने विशालवर हल्ला केला. यात विशालच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. विशाल घटनास्थळी रक्तबंबाळ झाला आणि यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एकाला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी एक गंभीर इशारा आहे.