मुंबई : पेटीएम फाऊंडेशनच्यावतीने राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणासाठी राज्य शासनाला सहकार्य करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की कोविडच्या संकटाने सगळ्यांनाच खूप मोठा धडा दिला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट होईल आणि अशा अनेक संकटांना तोंड देणारी ठरेल, यावर भर दिला जात आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “विकास होत राहील, पण जीव वाचले तर विकासाला खरा अर्थ आहे. आपण विकास, विकास म्हणून ज्याच्या मागे धावत होतो, त्या विकासाने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. आता आपल्याला ऑक्सिजनच्या मागे धावावे लागत आहे. कोरोना संसर्गाने आपल्याला धडा दिला आहे. पहिल्या लाटेत आम्ही खूप सुविधा जाणीवपूर्वक वाढवल्या पण त्याही आता अपूऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे आता लसीकरण सुरू झाल्यानंतरही आरोग्य सुविधा वाढविणाऱ्यावर भर आहे. आता जुलैनंतर पावसाळ्यामुळेही अनेक साथीचे आजार पसरू लागतात. त्यांना तोंड देण्यासह कोविड संसर्गाची तीसरी, चौथी आणि अशा कितीही लाटा आल्या तरीही त्यांना थोपविण्यासाठी, लोकांना उपचार मिळावेत यासाठी जास्तीत जास्तीत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.”
मुख्यमंत्री म्हणाले, “राज्यातील ऑक्सिजन निर्मिती पंधराशे मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. त्याशिवाय ज्या-ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होतील, असे प्रयत्न आहेत. त्यामध्ये तात्पुरत्या आणि दीर्घकाळाचे असे नियोजन आहे. बेड्सची संख्या, तसेच कोविड केंद्रांचीही संख्या वाढवणार आहोत.”
पेटीएम फाऊंडेशन स्वतःहून पुढे आल्याबद्दल मुख्यंत्र्यांनी कौतुकोद्गारही काढले. पेटीएम फाऊंडेशनने ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणात लसीकरणासाठी सरकारी यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी लस उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक सहाय्याचीही तयारी दर्शवली आहे. राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीत, तसेच लसीकरणासाठी मुंबई-पुण्यातील मोठ्या कंपन्यांची कार्यालयांचा परिसर आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची तयारीही फाऊंडेशनने दर्शविली आहे. लशीसाठी आवश्यक अर्थसहाय्यही सामाजिक बांधिलकी निधीतून तसेच विविध मार्गातून फाऊंडेशन करणार आहे. यावेळी झालेल्या चर्चेत मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यात ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत आणि स्वयंपूर्णतेसाठी ‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ राबविण्यासाठी म्हणून विविध प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.
पेटीएम फाउंडेशनचे विजय शेखर शर्मा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कोविड उपाययोजनांसाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पुढाकाराचे कौतुक केले. कोविडच्या लाटेला रोखण्यासाठी मास्क वापरासह, लसीकरणाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्राने पुढचे पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दूरदृष्टीकोनातून सुरू असलेले प्रयत्न देशासाठी मार्गदर्शक असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.




