मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराच्या अँटिलीयाच्या बाहेर संशयास्पद स्कॉर्पिओ कार सापडली होती. ती कार मनसुख हिरेन यांची असल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. मात्र, आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूने हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. वास्तविक, हिरेन यांच्या मृतदेहाच्या तपासणी दरम्यान त्यांच्या तोंडातून पाच हातरुमाल बाहेर आले आहेत. तसेच त्यांचा मृतदेह नाल्यातून सापडला आहे. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं आता बोललं जात आहे.
प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यांनी खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा होता. परंतु मनसुख हिरेन यांच्या तोंडात पाच रुमाल कोंबलेले आढळले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. शुक्रवारी मनसुख यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत नाल्यातून सापडला. त्यांचा मृतदेह खाडीतून बाहेर काढला, तेव्हा तो चिखलात बरबटलेला होता. त्यांचा शर्ट फाटलेला होता. मृतदेह तपासला असता त्यांच्या तोंडात 5 रुमाल आढळले. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं आता बोललं जात आहे.
मनसुख यांची पत्नी विमला हिरेन यांनी आत्महत्येचा अँगल पूर्णपणे नाकारला आहे. त्यांनी सांगितलं कि, मनसुख एक हसतमुख व्यक्ती होते आणि ते आत्महत्येचा विचारही करू शकत नव्हते. त्यांनी आत्महत्या केली ही अफवा आहे आणि त्याचा तपास झाला पाहिजे. त्या पुढे म्हणाल्या की, गुरुवारी मनसुख यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते, परंतु त्यानंतर ते घरी परतलेच नाही. कांदिवली येथून त्यांना तावडे नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला आणि त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. या अधिकाऱ्याला भेटण्याबाबत मनसुख यांनी सांगितले होते.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगितले की अंबानी यांच्या घराच्या अँटिल्याच्या बाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचे नाव सॅम आहे. त्याने कार देखभाल दुरुस्तीसाठी मनसुख हिरेन यांना दिली. परंतु, सॅमने पैसे दिले नाहीत तेव्हा मनसुख यांनी कार स्वत: कडे ठेवली. मनसुख यांनी पोलिसांना सांगितले होते की, 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ते ठाण्याहून घरी जात होते, तेव्हा गाडी वाटेतच थांबली. मनसुख घाईत असल्यामुळे त्यांनी कार ऐरोली पुलाजवळ रस्त्याच्या कडेला पार्क केली. दुसर्या दिवशी ते गाडी घेण्यासाठी गेले असता गाडी तिथे सापडली नाही. त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.




