पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात तळवडे-निगडी रस्त्यावर मंगळवारी दुपारी एक हृदय पिळवटून टाकणारा अपघात झाला. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) भरधाव ई-बसने दिलेल्या जोरदार धडकेत 9 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला तर तिची गरोदर बहीण गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात तळवडे चौकाजवळ दुपारी सुमारे 1.30 च्या सुमारास झाला.
मिळालेल्या माहितीनुर, मृत मुलीचे नाव सुधा बिहारीलाल वर्मा (वय 9) असे असून, गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव राधा राममनोज वर्मा आहे. अपघातानंतर पोलिसांनी बसचालक किरण भटू पाटील याला ताब्यात घेतले आहे.
राधा आणि तिचा पती तळवडे येथील एका खासगी कंपनीत काम करतात. राधा गरोदर असल्याने मदतीसाठी तिने दोन महिन्यांपूर्वी तिच्या लहान बहिणीला सुधाला गावावरून बोलावून घेतले होते. त्यांचा भाऊसुद्धा त्यांच्यासोबत राहून एका कंपनीत नोकरी करतो.
कसा झाला अपघात?
मंगळवारी दुपारी राधा कामावरून घरी परतली. जेवण करून ती पुन्हा कामावर जाण्यासाठी तिची लहान बहीण सुधा हिच्यासोबत निघाली. दोघी रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या PMPML च्या ई-बसने त्यांना जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की सुधाचा जागीच मृत्यू झाला. तर राधा गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या भीषण अपघाताचा थरार CCTV फुटेजमधून समोर आला असून, पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांनी या भागातील वाढत्या अपघातांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली असून, रस्त्यावरील वेगमर्यादा आणि वाहतूक व्यवस्थेत कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.




