मुंबई : शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील साहित्य संमेलनात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविषयी वादग्रस्त विधान केले. गोऱ्हे यांनी म्हटले की, ठाकरे यांच्या शिवसेनेत पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज गाड्या द्याव्या लागतात. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारणात मोठा गदारोळ उडाला आहे.
यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी गोऱ्हे यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. पेडणेकर म्हणाल्या, “नीलम गोऱ्हे या आरपीआय आठवले गटाच्या होत्या आणि नंतर शिवसेनेत आल्या. त्यांनी पदासाठी दोन मर्सिडीझ द्याव्या लागतात, असे आरोप केले आहेत. हे आरोप त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवावे. अन्यथा, आम्ही ठाकरेंच्या महिला संघटनेच्या वतीने त्यांना सोडणार नाही आणि कोर्टात जाऊ,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पेडणेकर यांनी नीलम गोऱ्हे यांना प्रश्न केला, “उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला ४ वेळा विधानपरिषदेचे पद दिले, त्यानंतर तुम्हाला काय कमी पडले? तुम्ही तिथे गेला आहात, तर त्या ठिकाणी सुखात राहा.”
नीलम गोऱ्हे यांचे कडवट शब्द
नीलम गोऱ्हे यांनी आपल्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रियेदाखल, पेडणेकर यांना “चुगलीखोर” आणि “उधळलेली” अशी उपमा दिली. त्यांनी त्यांच्या वक्तव्याद्वारे पेडणेकरवर टीका केली, आणि त्यांना आरोप केला की, त्या उद्धव ठाकरे यांची चुगली करत होत्या आणि पक्षात काड्या घालण्याचे काम करत होत्या. गोऱ्हे यांनी याबाबत आशा मामेडी यांना जाऊन विचारण्याचा सल्ला दिला.
माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका
माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाल्यानंतर राजीनामा न देण्यावर बोलताना किशोरी पेडणेकर यांनी म्हटले, “आता नैतिकतेचे काही उरलेले नाही. मविआ सरकारच्या काळात आम्ही संजय राठोड यांचा राजीनामा घेतला होता. गीता आणि संविधानावर हात ठेवून शपथ घेतो, त्याचे काही महत्व उरणार नाही. अजित पवार यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा दिला होता, तर आता त्यांच्या पक्षाचे धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही?” असा सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केला.




