सोलापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या मिनीबसला कंटेनरची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला आहे. मोहोळ तालुक्यातील कोळेगाव पाटीजवळ ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात कंटेनर चालकाचा ताबा सुटला आणि कंटेनरची थेट मिनीबसला धडक बसली. यावेळी कंटेनर व दुचाकीचा अपघात झाला आणि कंटेनर राॅन्गसाइडला जाऊन एका मिनी ट्रॅव्हल बसला धडकला. या अपघातात दुचाकीस्वार, बसचालकासह तिघे ठार झाले आहेत. तर बसमधील १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. मिनी बस मधील सर्व प्रवासी हे अक्कलकोट येथील स्वामी समर्थ दर्शन घेऊन पंढरपूरकडे विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले होते.
विचित्र अपघातात तिघांचा मृत्यू, १५ जखमी
सोलापूर-पुणे महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीस्वार दयानंद भोसले (वय ३५, रा. चंदननगर, लांबोटी ता. मोहोळ), मिनी बसचालक लक्ष्मण बासू पवार (वय ४०) आणि अंदाजे चाळिशीतील एक अनोळखी महिला असे तिघे ठार झाले आहेत. कोमल अनिल जोरकर, परी अनिल जोरकर, सई गौस, प्राची पाडुरंग मांढरे, भक्ती पांडुरंग मांढरे, बेबी सुधाकर गायकवाड, अनिता शंकर बारगे, संगीता रवींद्र शेडगे, कोमल सचिन मांढरे, रेश्मा नितीन चौधरी, सोनाली रमेश आडुळकर, सपना रमेश माहिते, अरव अरुण खाडे, छाया रतन शेडगे, रेखा दत्तात्रय चौधरी हे जखमी झाले आहेत.
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी बस तुळजापूर, अक्कलकोट दर्शन करून पंढरपूर येथे दर्शनासाठी निघालेली होती. पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला धडक बसली. बस क्र. एम. एच. १२. के. क्यू ११ ७५ सोलापूर-पुणे हायवेवरून पंढरपूरकडे जात असताना कोळेगाव पाटी येथे आली. कोळेगाव चौकात हा विचित्र अपघात झाला. कंटेनरच्या धडकेने मिनी बस रस्त्यावर पलटी झाली. बसमधील प्रवासी जखमी झाले. दुचाकी स्वार, बसचालक आणि एक महिला या तिघांचा जागीच मृत्यू झाला. जखमींवर सोलापूर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. या अपघातप्रकरणी तेजस्विनी मयूर मांढरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे




