मुंबई : जन्मदात्या वडिलांनीच आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीच्या १८ वर्षीय मुलीने तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. याप्रकरणी धक्कादायक बाब समोर आली आहे. १८ वर्षीय तरुणी, तिची लहान बहीण आणि आई-वडील असे चार लोक गिरगावात राहत होते. काही महिन्यांपूर्वी मोठ्या मुलीवर एका व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आल्यानंतर तिला अनाथालयात पाठवण्यात आलं होतं. याबाबत बालकल्याण समितीकडे तक्रार करण्यात आली होती.
दरम्यान, एक दिवस अनाथालयात असलेल्या मुलीला भेटण्यासाठी तिची आई गेली होती. त्यावेळी तिच्या आईनेच मुलीला सांगितलं की तिचे वडील तिच्या लहान बहिणीवर अत्याचार करतात. नायगाव येथील चाळीत हा प्रकार सुरु होता. आईने सांगितलेल्या प्रकरणानंतर मोठ्या मुलीने तिच्यावर देखील वडिलांकडून लैंगिक अत्याचार होत असल्याचं सांगितलं आणि आईला मोठा धक्का बसला. मोठ्या मुलीसोबत घडलेल्या घटनेची तिच्या आईला कोणतीही कल्पना नव्हती. मात्र, मोठी मुलगी घरातून अनाथालयात गेल्यानंतर तिच्या वडिलांनी लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. याबाबत मुलीच्या आईला समजले. त्यानंतर लहान मुलगी आणि तिची आई घरातून पळून गेल्या.
मोठी मुलगी ५ वर्षाची असल्यापासून सुरू होता अत्याचार
पोलिस तपासात अत्यंक धक्कादायक बाब समोर आली आहे. मोठी मुलगी २०११ मध्ये केवळ ५ वर्षांची होती, तेव्हापासून तिच्यावर स्वत:च्या वडिलांकडून अत्याचार सुरु होता. तिने याबाबत कुणालाही सांगितल्यास तिला मारुन टाकण्याची अशी धमकीही वडिलांनी दिली होती. त्यामुळे मुलीने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही.
अखेर या सर्व प्रकाराला वैतागून मोठ्या मुलीने बालकल्याण समितीकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर त्यांनी वर्सोवा पोलिसांत तक्रार दिली. वर्सोवा पोलिसांनी हे प्रकरण गिरगावात घडल्याने व्हि. पी. रोड पोलिसांत वर्ग केलं. त्यानंतर आरोपी वडिलांना अटक करण्यात आली असून चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.




