मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ झाली असल्यामुळे त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी तीन ऑक्टोबर रोजी होणार आहे. संजय राऊत यांना आज मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. राऊत यांच्याविरोधात पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शुक्रवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी आज सुनावणी पार पडली.
दरम्यान, पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी राऊत यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठोठावण्यात आली होती. संजय राऊत हे सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची न्यायालयीन कोठडी १९ सप्टेंबर म्हणजे आज संपणार होती. त्यामुळे आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली असता त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला. आज राऊत यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले होते. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.




