नवी दिल्ली : कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव हे बऱ्याच दिवसांपासून आजारी आहेत. गेल्या महिन्यात हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र 28 दिवस उलटूनही ते शुद्धीवर आलेले नाहीत. अलीकडेच, राजू श्रीवास्तव यांना शुद्ध आल्याचे आणि त्यांनी पत्नीचा हातही धरल्याचे सांगितले जात होते, मात्र त्यांची पत्नी शिखा श्रीवास्तव यांना याबाबत विचारले असता त्यांनी या वृत्ताला नकार देत राजू व्हेंटिलेटरवर असल्याचे सांगितले.
कॉमेडियन राजू श्रीवास्तव हे तब्बल २८ दिवस उलटूनही व्हेंटिलेटरवर आहेत. 10 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. जिममध्ये कसरत करत असताना राजू श्रीवास्तव यांच्या छातीत दुखू लागले आणि ते बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले, जेथे 11 डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत होते. यानंतर ते कोमात गेल्याचे दिसून आले. त्याच्या कुटुंबासोबतच राजू यांचे चाहतेही चिंतेत आहेत. दुसरीकडे, सोशल मीडियावर राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत खोट्या बातम्या व्हायरल होत आहेत. यावर पत्नी शिखा यांनी आक्षेप घेतला.
शिखा काय म्हणाल्या?
राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी शिखा श्रीवास्तव यांनी बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘मी एवढेच सांगेन की त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. तो सध्या व्हेंटिलेटरवर आहे. वैद्यकीय पथक सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तो लवकर बरा व्हावा आणि आमच्याकडे परत यावा यासाठी आम्हाला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे.
काही दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना संसर्ग झाला आणि खूप ताप आला. आयसीयूमध्ये दाखल असलेल्या राजू श्रीवास्तव यांच्याकडे पत्नी शिखाशिवाय इतर कोणालाही जाण्याची परवानगी नव्हती. राजूचे संपूर्ण कुटुंब रुग्णालयात त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे. सोशल मीडियावर चाहते राजू श्रीवास्तव लवकर बरे होऊन घरी परतावेत यासाठी प्रार्थना करत आहेत.




