चेन्नई : जन्मदात्या पित्याने स्वतःच्याच 13 वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूतील वेल्लोर येथील औद्योगिक युनिटमध्ये वेल्डर म्हणून काम करणाऱ्या 41 वर्षीय व्यक्तीला त्याच्या 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून गर्भधारणा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली, याबाबत पोलिसांनी गुरुवारी माहिती दिली. पीडित मुलीने एका मुलाला जन्म देखील दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्याची पत्नी 8 वर्षांपूर्वी वेगळे झाले होते आणि त्याची मुले (एक मुलगा आणि एक मुलगी) त्याच्या आणि त्याच्या पालकांसोबत वेल्लोरच्या अडुक्कंबराई येथे राहत होती. दरम्यान, मागील वर्षांपासून या व्यक्तीने आपल्या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली होती. यातून पीडित मुलगी गरोदर राहिली. तिला पोटात दुखायला लागल्यानंतर शासकीय वेल्लोर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिने एका मुलाला जन्म दिला. रुग्णालयातील कर्मचार्यांनी तिच्याकडे चौकशी केली असता नोव्हेंबर २०२१ पासून वडिलांनीच तिच्यावर अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले.
मुलीने हे सर्व सांगितल्यानंतर रुग्णालयातील कर्मचार्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी त्वरीत पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्यावर आयपीसीच्या कलम 376 (बलात्कार) आणि लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या कलम 5 (उग्र भेदक लैंगिक अत्याचार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी त्याला तुरुंगात नेण्यात आले आणि पॉक्सो न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.




