उत्तर प्रदेश : मुलीने शाळेत जाण्यास नकार दिल्यामुळे तिच्या आईने धक्कादायक कृत्य केले. तिची आई कांचनने आधी गॅसच्या शेगडीवर चाकू तापवला, त्यानंतर तिने मुलीच्या हात आणि पायांवर 17 ठिकाणी चटके दिले. यामुळे ही 5 वर्षांची चिमुकली गंभीर भाजली. यावेळी तिचे वडील राहुल कामावर गेलेले होते.
मुलीचे वडील राहुल यांना हा प्रकार समजताच ते तात्काळ घरी पोहोचले आणि त्यांनी मुलीला पोलिस ठाण्यात नेले. मुलीचे वडील राहुल यांनी त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपी आईला अटक केली. मात्र, तिच्याबरोबर लहान बाळ असल्यामुळे तिला रात्री घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कांचन ही संत कबीर नगर येथील पिप्रौली गावात राहत होती. त्यादरम्यान ती काळेसर येथे राहणाऱ्या राहुल नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली. दोघांनी 2016 मध्ये लग्न केले. राहुलच्या लग्नावर त्याचे कुटुंबीय खूश नव्हते. त्यामुळे तो कुटुंबाशिवाय पत्नी कांचनसोबत राहत होता. त्याच्या कुटुंबात त्याचे आई-वडील, एक लहान भाऊ आणि एक लहान बहीण आहे. दरम्यानच्या काळात राहुल आणि कांचन या दाम्पत्याच्या घरी दोन मुलींचा जन्म झाला. मोठी मुलगी 5 वर्षांची आणि धाकटी मुलगी 9 महिन्यांची आहे. राहुल हा मजुरीचे काम करतो.
या दाम्पत्याची मोठी मुलगी शान्वी हिला जवळच्याच पार्वती पब्लिक स्कूलमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी तिला पहिल्यांदाच शाळेत जायचे होते. मात्र, चिमुकली शान्वी शाळेत जाण्यास नकार देत होती. याचा राग येऊन तिच्या आईने 5 वर्षीय चिमुकलीला चाकूने 17 ठिकाणी चटके दिले.




