अमरावती : आमदार बच्चू कडू यांनी २००५ मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करताना पोलिसांसोबत हुज्जत घातली होती. या प्रकरणात अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. अडकर यांनी सोमवारी कडू यांना २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख ५ ऑगस्ट २००५ रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली होती. बैठक सुरू असतानाच आमदार कडू यांनी तापी नदी प्रकल्पासंदर्भात ‘मटकी फोडो’ आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान आमदार कडू यांनी पोलिसांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीनंतर ४ जुलै रोजी निर्णय देताना बच्चू कडू यांना वेगवेगळ्या कलमान्वये एकूण २० हजार रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणात सरकारी पक्षाकडून अॅड. सुनील देशमुख यांनी युक्तिवाद केला.



