उत्तराखंड : उत्तराखंड सरकारमधील माजी मंत्री राजेंद्र बहुगुणा यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पाण्याच्या टाकीवर चढून बहुगुणा यांनी स्वतःवर गोळी झाडली. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला होता. बहुगुणा यांच्या सुनेने त्यांच्यावर नातीचा विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर त्यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हल्दवानी सर्कल ऑफिसर (सीओ) भूपिंदर सिंग धोनी यांनी सांगितले की, मंगळवारी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सविता यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यात त्यांच्यावर शिवीगाळ, धमकी आणि मारहाण केल्याचा आरोप होता. आत्महत्या करण्यापूर्वी बहुगुणा यांनी पोलिसांना बोलावले आणि नंतर पाण्याच्या टाकीवर चढून पिस्तुलाने गोळी झाडत आत्महत्या केली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना खाली येण्यास सांगत होते, मात्र त्यांनी अचानक सोबत आणलेली बंदूक घेतली आणि छातीत गोळी झाडली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, पण त्यांना वाचवता आले नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
बहुगुणा आपल्या सुनेने केलेल्या आरोपांमुळे नाराज होते. आता बहुगुणा यांच्या मुलाने पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या मुलाने आरोप केला आहे की त्याच्या पत्नीने हे आरोप वैवाहिक कलह झाल्यानंतर केले आहेत. दरम्यान, बहुगुणा यांच्या आत्महत्येनंतर मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांच्या सुनेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 59 वर्षीय राजेंद्र बहुगुणा 2002 मध्ये राज्याच्या पहिल्या निवडून आलेल्या सरकारमध्ये मंत्री होते.




