मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या इंधन धोरणावर टीका केली आहे. ते म्हणाले, लज्जास्पद महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे.
केंद्र सरकारपाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही रविवारी इंधन करकपात करून नागरिकांना दिलासा दिला. राज्य सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात 2 रुपये 08 पैसे, तर डिझेलवरील करात 1 रुपया 44 पैसे कपात केली. मात्र राज्य सरकारने केलेली ही दरकपात म्हणजे सर्वसामान्यांनी थट्टा असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली त्यांनी याबाबत एक ट्विटही केले आहे.
दरकपात केलीच नाही
फडणवीस म्हणाले, इंधनाची मूळ किंमत,विक्रेत्यांना दिले जाणारे कमिशन,रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस तसेच अॅग्रीकल्चर अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस अशा सर्व बाबींवर राज्य सरकार करआकारणी करते. त्यामुळे यापैकी कोणत्याही घटकातील कर केंद्राने कमी केला तर राज्याचा कर आपोआप कमी होतो. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलवर 2.08 रुपये आणि डिझेलवर 1.44 रुपये जे कमी झाले, तो रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस केंद्र सरकारने कमी केल्याने राज्याचा कर कमी झाला आहे. स्वत: काहीच करायचे नाही आणि केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचे सुद्धा श्रेय घ्यायचे, हे फारच गंभीर आहे.
इंधनाची मूळ किंमत,विक्रेत्यांना दिले जाणारे कमिशन,रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस तसेच अॅग्रीकल्चर अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस अशा सर्व बाबींवर राज्य सरकार करआकारणी करते. त्यामुळे यापैकी कोणत्याही घटकातील कर केंद्राने कमी केला तर राज्याचा कर आपोआप कमी होतो.#PetrolDiesel
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 23, 2022
मे महिन्यात ‘एप्रिल फूल’
ते पुढे म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारने लोकांना मुर्ख न बनविता तत्काळ पेट्रोल-डिझेल दरकपातीचा निर्णय घ्यावा, ही माझी पुन्हा मागणी आहे. कालची घोषणा पाहून ‘उंटाच्या तोंडात जिरे’ असे मी म्हटले होते. पण, प्रत्यक्षात तर हा संपूर्ण प्रकार मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ करणारा ठरला.”
महाविकास आघाडी सरकारने लोकांना मुर्ख न बनविता तत्काळ पेट्रोल-डिझेल दरकपातीचा निर्णय घ्यावा, ही माझी पुन्हा मागणी आहे.
कालची घोषणा पाहून ‘उंटाच्या तोंडात जिरे’ असे मी म्हटले होते. पण, प्रत्यक्षात तर हा संपूर्ण प्रकार मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ करणारा ठरला.#Maharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 23, 2022
केंद्रातल्या सरकारने 2 लाख 20 हजार कोटी रुपयांचे नुकसान स्वीकारले आणि आपण मात्र 2500 कोटींचे नुकसान होत असल्याचे सांगत आहेत. खरं तर किमान केंद्र सरकारने या ठिकाणी जेवढी दरकपात केली त्याच्या दहा टक्के तरी कपात राज्य सरकारने करायला पाहिजे होती पण प्रत्यक्षात राज्य सरकारने कोणतीच कपात केली नाही जेही दोन रुपये इंधनावर कमी झाले तो केंद्रातील दरकपातीचा परिणाम आहे. राज्य सरकारने मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता, पण राज्य सरकारने सामान्य नागरिकांची क्रूर थट्टा केली आहे.




