मुंबई : केंद्र शासनाने काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.
केंद्राकडून कर कमी झाल्यानंतर राज्य सरकारने देखील पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्याने कमी केलेल्या करामुळे दोनच दिवसांत पेट्रोल आता ११ रुपये ५८ पैशांनी स्वस्त झालं आहे. तर डिझेल ८ रुपये ४४ पैशांनी स्वस्त झालं आहे. पेट्रोल-डिझेलचे हे नवे दर कधी लागू होतील याबाबत सध्या अधिकृत माहिती नाही. पण, लवकरच हे दर लागू होण्याची शक्यता आहे.
Maharashtra government slashes VAT on petrol by Rs 2.08 and diesel by Rs 1.44
— Press Trust of India (@PTI_News) May 22, 2022
मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारत होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती.




