मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी आज दुपारच्या सुमारास शरद पवारांच्या सिल्वर ओक या घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 104 कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना आठ वाजेच्या सुमारास परळ येथील त्यांच्या घरातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि चौकशीनंतर अटकेची कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सदावर्ते यांच्यावर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जमावाला भडकवणे, कलम १४१, १४९, १२० ब (कट रचणे), अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे कलम ३५३, यासह चिथावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पोलिसांना सदावर्ते यांची काही चिथावणीखोर भाषणंही मिळाली आहे. यात सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांना चिथावल्याचा दावा करण्यात येत आहे.
थोड्याच वेळात गुणरत्न सदावर्ते यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात येणार असल्याची माहिती असून उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.
माझी हत्या होऊ शकते, गुणरत्न सदावर्ते यांचा गंभीर आरोप
मुंबई पोलिसांनी ताब्यात घेताच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एक गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी मला कुठल्याही प्रकारची नोटीस न देता चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. माझ्या पत्नीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. माझ्या जीवाला धोका असून माझी हत्या होऊ शकते असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.




