आजपासून (८ ऑगस्ट) गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मनसेनं विशेष बस सेवा सुरु केली आहे. या बस सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. या बस सेवेला प्रारंभ झाला असून दादरमधून पहिली बस कोकणसाठी रवाना झाली. हा उपक्रम मनसे आणि महापालिका कामगार सेनेच्या वतीने राबवण्यात आला आहे.
या प्रवासासाठी मनसेच्यावतीनं पॅसेंजर सेफ्टी कीट बनवण्यात आलं आहे. यामध्ये फेस मास्क, हँड ग्लोव्ह्ज, सॅनिटायझर, बेडशीट यांचा समावेश आहे. सुमारे २५० बसेसपैकी आज २५ टक्के बसेस दिवसभरात विविध वेळांमध्ये सोडण्यात येणार आहेत. आज १० ते १५ बसेस दादरवरुन सुटणार आहेत. तर काही बसेस या ठाणे, भांडूप आणि इतर भागातून सोडण्यात येणार आहेत. पन्नास प्रवाशांची क्षमता असलेल्या बसमधून निम्म्याच प्रवाशांना जाता येणार आहे. चिपळून, महाडपासून कणकवली-सावंतवाडीपर्यंत या बसेस जाणार आहेत, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.




